परभणी (प्रतिनिधी)
परभणी जिल्हा कारागृह शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा हादरले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. परभणी जिल्हा कारागृहात शुक्रवार 2 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मृत कैदी राजू गोविंदराव अडकिने (वय 33, रा. दारेश्वर ता. वसमत जि. हिंगोली) हा 2022 साली ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका तिहेरी खून प्रकरणात आरोपी होता. त्याची जामीन न झाल्याने तो परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी होता. त्याने जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक 1 मधील शौचालयात शालच्या साहाय्याने सदरील कैद्याने आत्महत्या केल्याचे रात्रपाळीवरील कारागृह पोलिसांच्या लक्षात आले. तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच न्यायाधीश वर्मा, कारागृह अधीक्षक मारळे, पोलीस उपअधीक्षक बेनिवाल, महसूल प्रशासन तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी जिल्हा दाखल झाले. रात्रभर पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
