परभणी,दि.05(प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांविरोधात आता ठाम लढा उभारण्याची गरज आहे. यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार श्रीमती फौजिया खान यांनी दिली. कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानिमित्त आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार फौजिया खान, माजी आमदार विजयराव गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष भिमराव हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस व्यंकटराव कदम, शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, ज्येष्ठ पदाधिकारी श्रीमती सोनाली देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा केंद्रे, संतोषराव बोबडे, तहसीन अहमद खान यांच्यासह रितेश काळे, गजानन आंबोरे, अशोक बोखरे, गंगाधर जवंजाळ, मनोज थिटे, अशोक ताथवडे, प्रदीप वावले, शिवा नेटके, शशी हत्तीअंबिरे, लखन चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार फौजिया खान म्हणाल्या, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये तरुण आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. सत्ताधार्यांच्या विरोधात सर्व समविचारी लोकांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देईल. महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांसाठी हजारो कोटींचे पॅकेज जाहीर केले असले, तरी अनेक शेतकर्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. शासनाने जाहीर केल्यानुसार पूर्ण मदत न देता तुटपुंजी रक्कम देऊन शेतकर्यांची बोळवण केली आहे. शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी आमदार गव्हाणे यांनी सत्ताधार्यांवर टीका करताना सांगितले की, शासनाच्या अपयशामुळे शेतकर्यांचे हाल होत आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करण्यात येईल. सत्ताधार्यांविषयी जनतेत नाराजी असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच भरघोस यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
