महापालिका कर्मचार्‍यांचे उपोषण स्थगित

अनुदानासाठी नगर विकास विभागाने केले समितीचे गठण

परभणी(प्रतिनिधी)
महापालिकांना वस्तु व सेवा कर (जीएसटी) अनुदान द्यावे, या मागणीसाठी परभणी शहर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत संवर्ग, अधिकारी कर्मचारी संघटना यांनी मंगळवार (दि.4) पासून मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते. शासनाने या उपोषणाची दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि.5) दखल घेऊन याबाबत विशेष समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती संघटनांना दिल्याने सलग्न सर्व अधिकारी, कर्मचारी संघटनांनी उपोषण स्थगित केले आहे.

या निर्णयामुळे परभणी शहर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व कर्मचारी बुधवारी दुपारी परभणी येथे परतले. त्यानंतर महानगरपालिका कार्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच कर्मचार्‍यांनी महानगरपालिका आयुक्तांचे देखील यावेळी आभार मानले. दरम्यान नगर विकास विभागाने संघटनेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील महानगरपालिकांना वाढीव जीएसटी अनुदान देण्यासाठी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुढील 30 दिवसांत आपला अहवाल शासनास सादर करेल. समितीच्या शिफारशींनुसार महानगरपालिकांना वाढीव अनुदान देण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात येईल. या पत्रावर शासनाचे कक्ष अधिकारी धनंजय भागवत यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!