Post Views: 172
परभणी(प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर दाखल होणार असून उद्या आणि परवा ते परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांशी थेट संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने 18 हजार रूपये हेक्टरी अनुदान जाहीर केले. परंतु, परभणी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना हेक्टरी 8 हजार 500 रूपये एवढीच नुकसान भरपाई देण्यात येत आहे. शेतकर्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी 10 हजार रूपये देण्याचे जाहीर केले परंतु, परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांना अद्याप छदामही मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे हे मराठवाड्यात संवाद दौरा करणार आहेत, असे आनेराव यांनी म्हटले.
निवडणुकीमध्ये शेतकर्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन सरकाने दिले होते. परंतु, अद्यापही शेतकर्यांचे कर्जमाफी करण्यात आली नाही. शेतकर्यांना अनुदानही मिळाले नाही. शेतकर्यांची कर्जमाफी करावी, अनुदान देण्यात यावे, ओला दुष्काळ जाहीर करावा या अनुषगांने श्री. ठाकरे यांचा परभणी जिल्ह्यात संवाद दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे, असे ते म्हणाले.
परभणी तालुक्यातील पिंगळी या जिल्हा परिषद सर्कलच्या ठिकाणी श्री ठाकरे हे उद्या दुपारी 4 वाजता थेट शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच शनिवारी सकाळी 10 वाजता मानवत तालुक्यातील ताडबोरगाव व सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आनेराव यांनी दिली.
दरम्यान, या पत्रकार परिषदेस जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांची उपस्थिती होती.