परभणी( प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या सर्वसाधारण कार्यक्रम पत्रिका-२०२५ अन्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी दिनांक 9 नोव्हेनेबर रोजी सकाळी श्री मंगल कार्यालय, परभणी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन उज्वला म. नंदेश्वर (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी) यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे औचित्य साधुन कायदेविषयक जनजागृती आपल्या अध्यक्षीय भाषणातुन केली. समाजामध्ये वंचितासाठी न्याय आणि समानतेचा संदेश पोहचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी त्यांच्या भाषणात पुढे असे नमुद केले की, भारतीय राज्य घटनेनुसार तसेच राष्ट्रीय विधी सेवा कायदा, 1987 नुसार समाजातील दुर्बल, गरीब, वंचित घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध आहे. आपण सर्वांनी या दिवसाचे खरे महत्व ओळखुन समाजात न्याय आणि समानतेचा संदेश पोहचवणे हिच आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव भुषण. एम. काळे यांनी या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक केले. प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिन याचे महत्व सांगितले. या कार्यकमाच्या सुरूवातीला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रसिध्द केलेल्या गाण्यातुन विधी सेवेचे महत्व दाखवण्यात आले.
सदरील कार्यक्रमास डी.डी. कुरुलकर (जिल्हा न्यायाधीश, गंगाखेड), व्ही.एस.माने (जिल्हा न्यायाधीश, परभणी), एम.एम. वर्मा (मुख्य न्यायदंडाधिकारी, परभणी), जी.बी. यादव (दिवाणी न्यायाधीश व स्तर, गंगाखेड) तसेच न्यायालयीन कर्मचारी व नागरीक यांची उपस्थिती होती.
