एका महिलेसह तीच्या मुलांचे इच्छेविरुध्द धर्म परिवर्तन केल्याबद्दल सहा जणांविरुध्द गुन्हे दाखल

परभणी(प्रतिनिधी) पाथरी रस्त्यावरील शाहु नगरातील एका महिलेसह तीच्या मुलांचे इच्छेविरुध्द बळजबरीने धर्म परिवर्तन केल्याबद्दल सहा जणांविरुध्द येथील नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        शाहु नगरातील सौ. दिपाली अजय फरकले या मातंग समाजातील महिलेने रविवार नऊ नोव्हेंबर रोजी रात्री नानलपेठ पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. त्यात, ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार करणार्‍या एका महिलेने 6 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या घरी येऊन बायबल या ग्रंथातील वचन वाचून ऐकवण्यास सुरुवात केली. सुमारे एक तासाच्या त्या कार्यक्रमानंतर आपणास बाप्तिस्मा घ्यावयास विनंती केली, त्यास आपण नकार दिला. तेव्हा बाप्तिस्मा घेणं कसं चांगले आहे, त्यावर येशू कसा प्रसन्न होतो, आशिर्वाद देतो असे नमूद करीत तुमचे पती घरी आल्यानंतर आम्ही पुन्हा येऊ व प्रार्थना करु असे म्हणून आपणास एक मोबाईल नंबर देऊन ते माघारी परतले. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दोन महिलांनी येऊन पुन्हा आपणास बाप्तिस्मा घ्यावयाचा आग्रह केला. तुला स्वर्गात जागा भेटणार, असे सांगून आपली जात विचारली, सोबत यावयाचा आग्रह केला. गल्लीतील एका ऑटोवाल्यास बोलावून आपल्यासह तीनही मुलांना भिम नगर येथील अहिल्याबाई कदम नामक महिलेल्या घरी नेते. त्या ठिकाणी 12 ते 15 जण हजर होते. त्यातील एक महिला आपल्या ओळखीची होती. त्या ठिकाणी आपणास बाप्तिस्मा घेण्याबद्दल पुन्हा आग्रह झाला. तू मुर्ती पुजा करायची नाही, देवाचा प्रसाद खायचा नाही, तू देवाचा प्रसाद खाल्ल्यास व पूजा केल्यास तू नरकात जाशील, असे धमकावून एका व्यक्तीने त्याच्याकडील बॉटलमधील लालसर पाणी प्यावयास दिले. हे पाणी येशूचे रक्त आहे. ते प्यायल्याने तूला व तुझ्या मुलांना स्वर्ग प्राप्ती होणार आहे, असे सांगून त्या मंडळींनी आपणास बळजबरीने पाणी पाजले. त्यावेळी आपला मोठा मुलगा अजिंक्य हा पाणी पिण्यापूर्वीच तेथून पळून गेला. तेव्हा या सार्‍या मंडळींनी माझ्यासह माझ्या दोन मुलांना प्रार्थना करायला लावली. तीन डब्बे पाणी अंगावर टाकले. कपडे बदलण्याकरीता भाग पाडले. तीन अर्जांवर सही घेतली. फोटो काढले. तू आता बाप्तिस्मा घेतला असून तुझे धर्म परिवर्तन झाले आहे. असे या मंडळींनी आपणास म्हटले. आपण मर्जीविरुध्दचा तो प्रकार नवर्‍यास सांगितल्यानंतर तो ओरडला, तेव्हा आपण संबंधित व्यक्तींना माझे ते कागदपत्र पुढे पाठवू नका, मला परत करा, अशी विनंती केली. परंतु, संबंधितांनी दाद दिली नाही. सामाजिक कार्यकर्त्या रेखा प्रभाकर पाईकराव यांना आपण या सार्‍या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले, असे या महिलेने या तक्रारीद्वारे नमूद केले.
          प्रतिक अवधना नारायण मिश्रा (रा. मुंबई), आरती मधुकर गवळी, पल्लवी मधुकर गवळी, प्रगती संजू साखरे (सर्व रा. हमलापूर विष्णू नगर, नांदेड) यांच्यासह अहिल्या कदम (रा. परभणी) व संजू कुमार बसप्पा साखरे या मंडळींनी माझे व माझे मुलांचे इच्छे विरुध्द ही धर्म परिवर्तनाची कृती केली आहे, असे या महिलेने नमूद केल्यानंतर नानलपेठ पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती या मंडळींविरोधात अल्पवयीन न्याय कायदा 215 कलम 75 व 77, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोना यांना प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम 213 (3), भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 कलम 299, 302 व 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
       दरम्यान, यावेळी अ‍ॅड. महेश ढोबळे, अ‍ॅड. अमोल देशमुख, शंकर देशमुख, सोनू देशमुख, अभि गंगाखेडकर यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!