जिंतूर (प्रतिनिधी)
जिंतूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)ने आज भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल केली. पक्षाच्या वतीने सबिया बेगम कफिल फारूकी यांनी सभाशोधनात मोठ्या समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी दाखल करण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची मोठी गर्दी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर दिसून आली. पक्षाच्या झेंड्याने सजवलेल्या वाहन रॅलीसह नेते, पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल कार्यक्रम उत्साहात पार पडला. डीजे पथक, ढोल-ताशांच्या गजरात पक्षाच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, युवानेते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सबिया बेगम फारूकी यांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. नागरिकांशी संवाद साधताना सबिया बेगम यांनी शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, महिलांच्या सुरक्षेसह सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन दिलेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या या उमेदवारी आणि शक्ती प्रदर्शनामुळे शहरातील निवडणूक वातावरणात आणखी रंग चढला असून इतर पक्षांच्या पॅनेलवरही याचा थेट परिणाम दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिंतूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी वेगाने सुरू केली असून, उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेला गती आल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
