अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस २० वर्षे सक्त मजूरी
-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
परभणी(प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात आरोपी प्रशांत बळीराम काळबांडे यास जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्त मजूरीची कठोर शिक्षा सूनावली आहे.
नानलपेठ पोलिसांत २५ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल तक्रारीत म्हटले होते की, ममदापूर ता. पूर्णा येथील प्रशांत उर्फ प्रसाद बळीराम काळबांडे याने प्लॉट खरेदीच्या निमित्ताने जवळीक साधून, लग्नाचे आमिष दाखवून मे 2020 मध्ये जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पुढे आरोपीने त्याचे साथीदार राजेश गोपिचंद काळे रा. चिखली ता. औंढा नागनाथ याच्या मदतीने घरावर दगडफेक करीत शिवीगाळ केली. हस्तक्षेप करणार्या रतन चारक व रमन चारक या दोघांना लाठी – काठीने मारहाण केली. तसेच आपल्या आईलाही बेदम मारहाण केली.
या प्रकरणी नानलपेठ पोलिसांत अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे लागू करीत उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश कुमार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांच्यासमोर सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. आनंद गिराम यांनी पिडीता व जखमी साक्षीदारांची साक्ष सादर केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या सूनावनी नंतर पोक्सो कायदा कलम 3 व 4 अंतर्गत आरोपीस 20 वर्षे सक्त मजूरी व 40 हजारांचा दंड ठोठावला. भादंवि कलम 376 (2)(एन)(जे) अंतर्गत 10 वर्षे सक्त मजूरी व 40 हजारांचा दंड व इतर कलमान्वये विविध शिक्षा सुनावल्या. आरोपीकडील दंड रक्कमेतून पिडीता व तिच्या आईस समान रक्कम वाटप करण्याचेही आदेश दिले. तसेच आरोपी राजेश काळे यास सक्त मजूरी व दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी सुरेश चव्हाण, अंमलदार हनुमंत तांदळे, दत्तराव खूणे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
