परभणी शहर महानगरपालिका निवडणूक
परभणी,(प्रतिनिधी) परभणी शहरातील एकूण 16 प्रभागात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना महानगरपालिकेंतर्गत 16 प्रभागातील सर्व 65 जागावर उमेदवार निश्चित करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. 15 प्रभागात 4 तर एका प्रभागात 5 उमेदवारांची सांगड घालण्याकरिता पक्षांना उमेदवार मिळत नाही. उमेदवार मिळाले तरी सर्व उमेदवारामध्ये तालमेल बसवणे अवघड होत आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत स्वबळावर संपूर्ण 65 जागा लढविण्याची ताकद कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षात किंवा त्यांच्या नेतृत्वात नाही, असे चित्र समोर आले आहे.
महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेली आहे. मागील दोन निवडणूकीतून ते सिध्दही झाले. परंतु, आगामी निवडणूकीत काँग्रेस ची अवस्था चांगली नसल्याचे दिसते. काँग्रेसला सर्व प्रभागात उमेदवार मिळतील की नाही याची शाश्वती नाही.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, सय्यद समी उर्फ माजु लाला यांच्यासारख्या भक्कम अशा नेतृत्वाचा काँग्रेस पक्षास सोडचिठी दिलेली आहे. याशिवाय काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक अजित दादांच्या राष्ट्रवादीत किंवा भाजपात गेलेले आहेत. मुस्लिम समाजात पकड असणाऱ्या सय्यद समी उर्फ माजू लाला यांनी मशाल हातात घेतली आहे. काँग्रेसजणांसमोर सक्षम नेतृत्व म्हणून जिल्हाध्यक्ष बाबा जानी दुर्रानी, माजी आमदार सुरेश देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, भगवान वाघमारे यांनी पक्षाची कमान हातात घेतली आहे. त्यामुळे आता हे नेतृत्व कितपत प्रभाव पाडू शकतो यावरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहरात प्रभाव आहे. परंतु, स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील व खासदार संजय जाधव या दोघातील पक्षांतर्गत कलगीतुरा नेहमीच पक्षास नुकसानदायक ठरला आहे. माजूलाला यांच्या आगमनानंतर शिवसेना उबाठा काही जास्त जागा लढवतील परंतु शंभर टक्के जागा लढवण्याची ताकद शिवसेना उबाठा गटात नाही. तर दुसरीकडे
आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारीसाठी कोणीच फिरकत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खासदार श्रीमती फौजिया खान, ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे हे दोघे या पक्षाची धुरा सांभाळत आहे.
ज्येष्ठ नेते वरपुडकर यांच्या प्रवेशाने शहरात भाजपाची ताकद वाढली आहे.केंद्र व राज्यातील सत्ता, त्या जोडीस जिल्ह्यातील पालकमंत्री पद हे या साठी पूरक आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर व ज्येष्ठ नेते वरपुडकर हे या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावणार हे मात्र निश्चित आहे. स्पष्ट आहे. परंतु, शहरातील आठ पैकी सात ते आठ प्रभागात मुस्लिम बहुल्य मतदार आहेत त्यामुळे भाजपाला उमेदवार मिळणार नाहीत त्यामुळे हा पक्ष सुद्धा सर्व जागा लढवणार नाही त्यामुळे बहुमताचा आकड्यापर्यंत मजल भाजपाला मारता येणार नाही. राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाकडे उमेदवार जास्त प्रमाणात आहेत परंतु पक्षातील आतील गटबाजी व आयात केलेले उमेदवार यामुळे पक्षातील अंतर्गत वाद उफाळून येणार असल्याचे चित्र दिसत आहेत
