-सेलू शहरात SVEEP अंतर्गत मतदार जागृती अभियानास प्रारंभ
सेलू (प्रतिनिधी)आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ लक्षात घेऊन सेलू नगरपरिषद क्षेत्रात SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत मतदार जनजागृती अभियानास नूतन महाविद्यालय, सेलू येथे प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमामध्ये विशेषतः युवक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले. “युवक जागृत झाले तर मतदानाचे प्रमाण वाढेल व लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत होईल,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
सेलू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ची तयारी प्रशासनामार्फत पारदर्शक, निर्भय व सुरळीत पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शिवाजी मगर (तहसीलदार सेलू), तुकाराम कदम (मुख्याधिकारी, नगर परिषद, सेलू) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून नूतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मतदार जनजागृती शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांनी भूषविले.
विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचे महत्त्व विशद करून शपथ देण्याचे काम गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी केले. ते पुढे म्हणाले की “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा संवैधानिक हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत अत्यंत मौल्यवान आहे,”.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. राठोड म्हणाले, “विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान नोंदवून, आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार व समाजात मतदार जागृती करण्याचे नेतृत्व करावे. जबाबदार नागरिकत्वाची पहिली पायरी म्हणजे मतदान.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू बुधवंत यांनी केले. विस्तार अधिकारी संदीप पवार यांनी आभार मानले. अरुण राऊत व जनार्दन कदम यांनी जनजागृती उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेमुळे परिसरात सकारात्मक मतदार जागृती व लोकशाही बळकटीचा नवा संदेश पसरत असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.
