-महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५
परभणी(प्रतिनिधी)
परभणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नामनिर्देशनपत्र विक्रीच्या दुसऱ्या दिवशी बुधवार 24 डिसेंबर रोजी 355 अर्जांची विक्री झाली. तर दोन दिवसात एकूण 1 हजार 8 अर्जांची विक्री झाल्याचे निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 16 प्रभागांची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून चार तर प्रभाग क्रमांक 16 मधून पाच उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीची सर्व तयारी करण्यात आली आहे. तसेच पोलिस प्रशासनाने देखील आवश्यक मनुष्यबळ निवडणूक कामे पुरवून सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.मंगळवार 23 डिसेंबर पासून महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 653 एवढ्या नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 355 नामनिर्देशनपत्र विक्री झाले. असे दोन दिवसात एकूण 1 हजार 8 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. नामनिर्देशनपत्र सायंकाळी सात वाजेपर्यंत विक्री करण्यात येत आहे.
