परभणी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे निवडणूक लढविणार

परभणी(प्रतिनिधी) परभणी महानगरपालिकेच्या निवडणूका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रपणे लढवतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या नेतेमंडळींनी सोमवार 29 डिसेंबर रोजी परभणीत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेतून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरज चव्हाण, आमदार राजेश विटेकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, दादासाहेब टेंगसे, विजयराव जामकर, मधुकरराजे आर्दड, रोहन सामाले, अक्षय देशमुख, गणेश निरस यांच्यासह अन्य नेतेमंडळींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रवक्ते चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची युती ही नैसर्गिक असून स्थानिक पातळीवरील जनभावनेचा आदर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान तसेच अन्य पदाधिकार्‍यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार असून, त्या बैठकीत जागा वाटपाची सूत्रे निश्‍चित केली जातील. ही प्रक्रिया आज दुपारपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करताना चव्हाण म्हणाले की, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेची भावना लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत स्थानिक पातळीवर युती करण्यात आली आहे. या युतीचा महायुतीतील अन्य पक्षांवर कोणताही परिणाम होणार नसून, सर्व पक्ष समन्वयाने पुढील वाटचाल करतील, असा विश्‍वासही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!